महिला विकास कक्षाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी दि. ४ :- भारत शिक्षण मंडळाचे, देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष, इतिहास विभाग व आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांसाठी ‘महिलांचे सबलीकरण’ या विषयावर आधारीत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्रद्धा कळंबटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्त्या व महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या NGO व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्रद्धा कळंबटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडुन सांगितले. तसेच आजच्या काळात महिलांचे सबलीकरण म्हणजे काय व महिलांनी सबल व्हावे यासाठी कोणती वागणूक व विचार आत्मसात केले पाहिजेत याबद्दल विद्यार्थ्यांना खूप प्रेरणादायी व मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखा प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर उपस्थित होते. तसेच महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. आसावरी मयेकर, इतिहास विभाग प्रमुख प्रा. रिया बंडबे, इतर प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी शितप व कु. तन्वी पटवर्धन या विद्यार्थ्यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा. रिया बंडबे यांनी मानले.



