महाराष्ट्र

लांजा येथील वर्षा चव्हाण यांचा स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे ‘कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मान

मुंबई दि. १५ (सुरेश सप्रे) :- लांजा-रत्नागिरीच्या सुकन्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकण अभियानतर्फे दिला जाणारा ‘कोकणरत्न’ पुरस्कार आझाद मैदान येथिल पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

वर्षा चव्हाण या बदलापूर शहराच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एक तरूण तडफदार युवा नेतृत्व असून विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सामाजिक कामाची आवड व बांधिलकी यांचा संगम साधत वर्षा चव्हाण यांनी आपल्या कार्याची सुरुवात लांजा- रत्नागिरीतुन केली. त्यांनी सुरुवातीला स्फुर्ती फाउंडेशन संस्थेतून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने छाप सोडली आहे. सामाजिक कार्यातल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला.

त्यांची काम करण्याची पद्धत, संवादकौशल्य आणि महिलांसाठी केलेली सातत्यपूर्ण धडपड यामुळे अल्पावधीतच त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या. वर्षा चव्हाण यांचा सामाजिक आणि मानवाधिकार क्षेत्रातील सहभागही उल्लेखनीय आहे. त्या कोकण युवा सेवा संस्थेच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ह्यूमन राईट्स संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. त्यांचा सामाजिक बांधिलकीचा व्यापक दृष्टीकोन अधोरेखित होतो.

त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात जनादेश टीव्ही न्यूज निर्भय पत्रकार संघटनेतर्फे ‘जननायिका’ पुरस्कार. वैभव फाउंडेशन गोवा तर्फे ‘भारत निर्माण योगदान अवॉर्ड’ पूर्णत्व फाउंडेशनच्या ‘सन्मानमूर्ती’ पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

कोकणातील लांजा तालुक्यातील सुकन्या असलेल्या वर्षाताई बदलापूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर आहेत. युवा नेतृत्व म्हणून वर्षा चव्हाण आज नव्या पिढीच्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. पुढील काळात मुंबई आणि कोकणातील महिलांसाठी नवीन संधी, नवीन उपक्रम आणि सशक्ततेच्या दिशेने व्यापक कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button