रत्नागिरी

चिपळूण सायकलिंग क्लबच्या सौ. रमा करमरकर बनल्या सुपर रँडोनिअर्स

चिपळूण दि. २३ :-  ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण तर्फे आयोजित २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी, आणि ६०० किमी बीआरएम पूर्ण करुन सुपर रँडोनिअर किताब पटकावला आहे.

ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत भारतातील विविध क्लब बीआरएम या सायकल क्रीडाप्रकाराचे आयोजन करतात. २००, ३००, ४००, आणि ६०० किमी अंतर सायकल चालविण्यासाठी अनुक्रमे १३.५ तास, २० तास, २७ तास आणि ४० तासांची मुदतवेळ निर्धारित केलेली असते. संपूर्ण पणे सेल्फ सपोर्टेड असं या राईड्सचे स्वरुप असते. जानेवारी ते डिसेंबर या मुदतीत सदर बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडरला सुपर रँडोनिअर म्हणून किताब मिळतो. सौ. रमा करमरकर यांनी नुकतीच २० डिसेंबर रोजी ६०० किमीची बीआरएम ४० तासांच्या आत पूर्ण करुन सुपर रँडोनिअर हा किताब मिळविला आहे.

सौ. रमा करमरकर या चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्या असून आपल्या या यशाबद्दल बोलताना चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण हे यश मिळविल्याचे त्यानी नमूद केले. सौ. रमा करमरकर या चिपळूण पोलिस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून खात्याअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अशा स्पर्धांमधून त्यांनी यापूर्वी भरघोस यश प्राप्त केलेले आहे. २०२१ च्या महापुरामधे अडकलेल्या नागरिकांचे धाडसाने जीव वाचविल्याच्या कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तालुक्यातील एकेकट्या वृद्धांची काळजी घेणा-या सांज सोबत गृपच्याही त्या सदस्या आहेत. पोलिस ठाण्यात तक्रारी घेऊन येणा-या स्त्रियांचं व त्यांच्या कुटुंबीयांचं समुपदेशन करण्याबरोबरच त्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्या सदैव अग्रेसर असतात.

सह्याद्री रँडोनिअर्स क्लबने कराड सोलापूर, विजापूर, तासगांव, कराड या मार्गावर सदर बीआरएम आयोजित केली होती. या मोहिमेसाठी मुंबई, सातारा, विटा, इचलकरंजी, चिपळूण येथून सायकलस्वार सहभागी झाले होते. सायकलपटूंची सुरक्षितता जपत असतानाच त्यांचे मनोबल कसं उंचावेल, त्यांचा आहार, तब्येत याकडे विशेष लक्ष ठेवल्याबद्दल सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा मनोज भाटवडेकर यांच्याविषयी सर्वच सायकलपटूंनी कृतज्ञता व्यक्त केली. आदरभाव व्यक्त करताना आयोजकांचं संपूर्ण रुटवर उपस्थित असणं हे फार मोठं महत्वाचं ठरतं असं त्यांनी नमूद केलं. सौ. रमा करमरकर यांच्या या कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब, मित्रपरिवार तसेच समाजातील सर्व घटकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button