नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

रत्नागिरी दि. २१ : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमार्फत गेले पाच वर्ष रत्नागिरीमध्ये सायकल चळवळ सुरू आहे. निरोगी निरामय आयुष्य म्हणजे खरी संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी सायकल चालवा, व्यायाम करा, निरोगी रहा. विविध कला- क्रीडेमध्ये सातत्याने सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, असे प्रतिपादन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य मकरंद पटवर्धन यांनी केले.
पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला (कै.) सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य व श्रीमान रमेश कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. श्री. पटवर्धन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर, सदस्य प्रवीण आंबेकर, विश्वस्त विनायक हातखंबकर मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका वर्षा जोशी, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मांजरेकर प्रमुख उपस्थित होते.
श्री. पटवर्धन यांनी सांगितले की, अकरावी-बारावीचे विद्यार्थी हे करिअर घडवण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतात. अशावेळी क्रीडा, कला अशा गोष्टीतही रस दाखवा. आपल्याला करिअरच्या मार्गावर किंवा आयुष्यात संकटे, अडथळे आले तर क्रीडा आणि कला आपल्याला अडथळ्यावर मात करण्यासाठी उपयोगी ठरतात. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमध्ये अडीचशेहून अधिक सायकलिस्ट आहेत. क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथन स्पर्धा आणि किड्स सायक्लोथन आणि विविध सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल रॅलीचे आयोजन केले जाते.
मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला-गुणांना वाव देणे अतिशय महत्त्वाचे आहे. कला व क्रीडेच्या माध्यमातून उत्तम विद्यार्थी तयार होतात. उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसाठी उत्तम खेळाचे मैदान तयार करण्याची सूचना केली. विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांसाठी कौतुक केले. धनेश रायकर यांनी सांगितले की, विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासाठी नेहमी प्रयत्नशील असतो, त्याची मेहनत, चिकाटी यातूनच तो घडतो. अद्ययावत क्रीडांगण तयार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया अशी ग्वाही त्यांनी दिली.
सूत्रसंचालन मानसी चव्हाण यांनी केले. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका शुभांगी शिंदे, प्राजक्ता कुलकर्णी, निष्ठा कनगुटकर, शलाका वर्तक, शितल रोकडे, मानसी चव्हाण, मालन तांबोळी, शबनम तहसीलदार, तानाजी वाघमारे, योगिनी भागवत, श्रीपाद गुरव, वृंदाली गुरव, दीपिका कुलकर्णी उपस्थित होत्या. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी धनेश रायकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील ६५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी क्रिकेट, डॉजबॉल, कबड्डी, धावणे, गोळा फेक, दोरी उड्या, रस्सीखेच आदी स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.



