रत्नागिरीतील अभ्युदयनगर येथील नरहर वसाहत रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आले दिसून; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी दि. १८ : रत्नागिरी शहराच्या अभ्युदयनगर येथील नरहर वसाहत या रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. शहरात भरवस्तीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर येथील नरहर वसाहत येथे काल बुधवारी रात्री ही घटना घडली. या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरजोराने भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला.
त्यांनी तात्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिले असता, रस्त्यावर इतर भटकी कुत्री देखील जोरात भुंकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने त्यांनी आपल्या घराच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यामध्ये बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. बिबट्याचा वावर आता शहरी भागात दिसून आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



