नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी दि. १८ :- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगर पंचायतीच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाकडे २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार न्यायालयीन अपिल दाखल झाल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेमधील प्रभाग क्र. १० (१० अ व १० ब) करीता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे . त्यासाठी ४ मतदान केंद्र राहणार आहे.
दरम्यान, याआधी जिल्हातील सात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या १०० प्रभागात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान झाले. स्ट्राँग रुम करीता एसआरपी व पोलीस यांच्यामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सिक्युरिटी ऑडीट करण्यात आले आहे. सुरक्षा कक्षामध्ये व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही व्यवस्था बसविण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात आली असून, व्हॅक्युम क्लिनर व्यवस्था, वाळवी पेस्ट कंट्रोल उपाययोजना करण्यात आली असल्याचे श्री. जिंदल यांनी सांगितले.
दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होईल. यासाठी रत्नागिरी-नगरपरिषद कार्यालयातील संत गाडगेबाबा सभागृह, १६ टेबल, चिपळूण-युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृह, १४ टेबल, खेड- नगरपरिषद कार्यालय सभागृह, ५ टेबल, राजापूर-नगरपरिषद सभागृह, ५ टेबल, लांजा- तहसिल कार्यालय सभागृह, ७ टेबल, देवरुख- नगरपंचायत सभागृह, ९ टेबल तर गुहागर- श्री दे.गो.कृ.मा. विद्यालय येथील सभागृह, ६ टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत निकाल प्रसिध्द केला जाणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ माध्यम कक्ष उभारण्यात येणार आहे. प्रवेशिका दिलेल्या माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, निवडणूक यंत्रणेचे अधिकारी/कर्मचारी यांना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे.



