पोलीस दलातर्फे अत्याधुनिक ‘पोलीस हेल्थ क्लब’ सुरू; सर्वसामान्य नागरिकांनाही मिळणार प्रवेश!

रत्नागिरी दि. ३० :- सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याला खूप महत्त्व आले आहे. हीच गरज ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्याही आरोग्याला आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस मुख्यालय परेड मैदान, रत्नागिरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असा “रत्नागिरी पोलीस हेल्थ क्लब” सुरू करण्यात येत आहे. येत्या १ जून २०२६ पासून हा हेल्थ क्लब सर्वांसाठी खुला होणार आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
या क्लबमध्ये व्यायाम आणि फिटनेससाठी आवश्यक असणाऱ्या खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
स्टीम बाथ
कार्डिओ विभाग
वजन प्रशिक्षण (Weight Training)
बॉक्सिंग सुविधा
कॅलिस्थेनिक्स सुविधा
क्रॉसफिट सुविधा
मासिक, सहामाही आणि वार्षिक शुल्क रचना
या हेल्थ क्लबचा लाभ घेण्यासाठी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत माफक दरात सदस्यत्व शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी शुल्क:
मासिक शुल्क: ₹५००/-
सहामाही शुल्क: ₹२,७००/-
वार्षिक शुल्क: ₹५,४००/-
सर्वसामान्य नागरिकांसाठी शुल्क:
मासिक शुल्क:* १,०००/-
सहामाही शुल्क: ₹५,४००/-
वार्षिक शुल्क: ₹१०,२००/-
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. १ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक सुविधेचा रत्नागिरीतील सर्व नागरिक, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.


