रत्नागिरी

१९७१ च्या भारत – पाक युद्धातील सहभाग असलेले माजी सैनिक रामचंद्र देमा सावंत यांचे निधन

असंख्य लोकांच्या उपस्थितीत रामचंद्र सावंत यांना भावपूर्ण अश्रू नयनांनी निरोप

खंडाळा दि. ३० : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सन १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे माजी सैनिक आणि रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे गावचे सुपुत्र रामचंद्र देमा सावंत यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना उपस्थित भारतीय सैन्य दलाच्या सहकाऱ्यांनी आणि गावकरी व परिसरातील विविध क्षेत्रातील अनेक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र देमा सावंत हे कोळीसरे गावचे सुपुत्र असून, लहानपणीच वडिलांचे दुःखद निधन झाल्यानंतर, अत्यंत हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीत त्यांच्या आईने त्यांना शिक्षण देऊन मोठे केले. त्यानंतर शिक्षण घेत ते भारतीय सैन्यात १९७१ दाखल झाले. त्यानंतर त्यांची विविध ठिकाणी असणाऱ्या पोस्टवरती त्यांची नेमणूक झाली. त्यांची निवड झाल्यानंतर काहीच काळात भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले. त्या युद्धात फर्स्ट महार रेजिमेंट मध्ये त्यांनी या युद्धात पराक्रम गाजविला. यांच्यासह असंख्य सैनिकांनी केलेल्या कामगिरीमुळे देशाला विजय मिळाला.

याच कामगिरीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी रामचंद्र सावंत यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी कोल्हापूर येथे एकत्र आले होते. हा दिवस साजरा केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांच्या सर्व सहका-यांनी त्यांना कोल्हापूर मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

अनेक वर्ष सैन्यामध्ये नोकरी करून देशाची सेवा त्यांनी केली. त्यानंतरही सेवानिवृत्त झाल्यानंतर ते विविध क्षेत्रात कार्यरत होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात ते सातत्याने सर्वांना प्रोत्साहन देत कार्यरत होते. त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, मंडळे, ग्रामपंचायती याठिकाणी जाऊन विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्यासाठी मार्गदर्शन केले होते. या सर्व कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रचंड मोठा लोकसंग्रह एकत्र केला होता. अनेक अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेत जाणीवजागृती निर्माण केली होती.

सेवेत असताना, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आणि आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगीदेखील आपल्या सैनिकांच्या वेशातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या मृत्यूनंतर त्यांनी आपले अवयवदान करून नवीन आदर्श सर्वांसमोर निर्माण केला होता.

विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरातील विविध गावातील मंडळी उपस्थित होती. आर्मीमधील त्यांच्या सहका-यांनी त्यांना भारतीय सैनिकी पद्धतीने मानवंदना देत त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या जाण्याने खंडाळा परिसरात सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button