रत्नागिरी

प्रदिपकुमार देडगे यांच्या चित्राची ‘व्ही. व्ही. ओक’ कला प्रदर्शनासाठी निवड

संगमेश्वर दि. २५ ( प्रतिनिधी ):- कलेच्या क्षेत्रातील अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे ३८ वे अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती कला प्रदर्शन २०२६ लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या प्रदर्शनासाठी ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’चे प्रा. प्रदिपकुमार देडगे यांच्या चित्राची निवड करण्यात आली असून, कलावर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे.

पुण्यातील टिळक रोड येथील टिळक स्मारक मंदिर येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात भारतभरातील नामांकित आणि उदयोन्मुख कलाकारांची चित्रे, शिल्पे आणि ‘लाईव्ह स्केचेस’ प्रदर्शित केली जातात. ३८ व्या आवृत्तीसाठी निवड प्रक्रियेतून अत्यंत मोजक्या कलाकृतींची निवड करण्यात आली असून, त्यात प्रा. देडगे यांनी स्थान मिळवले आहे.या प्रदर्शनासाठी देशभरातून हजारो प्रवेशिका येतात. ३८ व्या आवृत्तीसाठी निवड झालेल्या कलाकारांना १९ जानेवारी २०२६ पर्यंत आपली मूळ चित्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

प्रदर्शनादरम्यान केवळ चित्र प्रदर्शनच नव्हे, तर लँडस्केप पेंटिंगची थेट प्रात्यक्षिके आणि विशेष कार्यशाळांचेही आयोजन केले जाते. हे प्रदर्शन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते.प्रा. प्रदिपकुमार देडगे हे सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये कार्यरत असून, त्यांच्या या निवडीमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आता फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात देशातील दिग्गज कलाकारांच्या चित्रांसोबत केले जाईल. या यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापक वृंदाने प्रा. प्रदिपकुमार देडगे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button