
रत्नागिरी दि. २४ :- विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या आंबा-काजू बागायतदारांसाठी दिलासा मिळाला असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची १०० कोटी ६१ लाख इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ आंबा-काजू बागायतदारांच्या याचा फायदा मिळणार असून, त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण बदलामुळे आंबा-काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान भरून निघावे यासाठी केंद्र-राज्य सरकारने फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांनी २०२४- २५या आर्थिक वर्षासाठी ३० हजार १३५, ३ हजार ३३३ काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. एकूण १८ हजार २४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते.
शेतकर्यांनी हप्त्यापोटी २१ कोटी ७४ लाख भरले, तर केंद्र राज्य आणि शेतकरी मिळून एकूण १०८ कोटी ५४ लाख रूपये विमा कंपनीला देण्यात आले होते. हंगाम संपल्यानंतर १६ दिवसांत ट्रिगरची माहिती संकलित करून ४५ दिवसांत परतावा देणे गरजेचे होते. मात्र तीन महिने होऊनसुध्दा कंपन्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही. सिंधुदुर्गात आंदोलन झाले, बैठका झाल्यानंतर सिंधुदुर्गात परतावा मिळाला. त्यानंतर रत्नगिरी जिल्ह्याला परतावा मंजूर झाला असून टप्प्या टप्प्याने परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा होत आहे.




