रत्नागिरी

शोएब मुख्तार इब्जी यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार –२०२३” जाहीर

रत्नागिरी दि . १ :-  महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी (महाराष्ट्र शासन) तर्फे २०२१, २०२२ आणि २०२३ सालचे पुरस्कार अखेर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कृत करते. संशोधन समितीच्या सविस्तर शिफारसीनंतर अल्पसंख्याक कामकाज मंत्री दत्तात्रेय भरणे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी या तीन वर्षांच्या पुरस्कार यादीस अंतिम मंजुरी दिली.

या पुरस्कार विजेत्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मजगावचे सुपुत्र व सिटिझन्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, उरणचे कार्यतत्पर व नामांकित शिक्षक शोएब मुख्तार इब्जी यांची “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३” या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

शोएब इब्जी हे केवळ एक उत्कृष्ट आणि सक्रिय शिक्षकच नाहीत तर ते प्रभावी वक्ते, प्रेरणादायी मार्गदर्शक, कवी, सूत्रसंचालक तसेच लेखक म्हणूनही परिचित आहेत. हे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचे व विद्यार्थी आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सन्मान आहे.

विशेष म्हणजे उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेची सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती होत असल्याच्या औचित्याने या भव्य कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा भव्य व प्रतिष्ठित सोहळा ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दिमाखदार वातावरणात पार पडणार असून, महाराष्ट्र शासनातील मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र व १५,००० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार केवळ शोएब इब्जी यांची वैयक्तिक उपलब्धी नसून त्यांच्या संपूर्ण इब्जी कुटुंबाची, संस्थेची, आपल्या मजगांव गांवाची आणि संपूर्ण उर्दू वाचकांची तसेच समाजासाठी अभिमानाची बाब आहे. शोएब सर यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या भविष्यास घडविण्यासाठी आणि योग्य दिशादर्शनासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण संस्थेला अभिमान वाटतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button