रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत सन २०१६ पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा लावला शोध

रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत सन २०१६ पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून हरवलेले व बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी “मिशन शोध” सुरु करण्यात आलेले आहे.
“मिशन शोध” च्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे मार्फत जिल्ह्यातील हरविलेल्या व बेपत्ता इसमांचा विशेष शोध घेण्यात येत आहे. दिनांक 05/04/2016 रोजी 10.30 वा. रत्नागिरी शहरातील “कंदिल लॉज” मधील रूम नं.208 मध्ये आलेले ग्राहक श्री. योगेश पुंडलिक खामकर हे रुमला लॉक करून परत येतो असे सांगून निघून गेले ते परत आले नाहीत म्हणून कंदिल लॉजचे मालक यांनी आजुबाजूचे परिसरात शोध घेतला परंतु नापत्ता इसम मिळून आला नाही म्हणून त्यांनी दिले खबरीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नंबर 22/2016 दिनांक 07/04/2026 रोजी दाखल करण्यात आला होता.
तात्कालिक तपासिक अंमलदार पोहवा/1497 प्रवीण वीर, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांनी नापत्ता श्री. योगेश पुंडलिक खामकर, वय 37 यांची माहिती प्रसिध्द होणेकरीता वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मिसिंग पर्सन ब्युरो, गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, भायखळा, मुंबई- 27, यांना सन 2023 मध्ये पत्रव्यवहार केला होता व तपासिक अंमलदार पोहवा/1248 प्रमोद कांबळे यांनी नापत्ता श्री. योगेश पुंडलिक खामकर यांच्या दिल्या पत्त्यावर एस.बी.एस. नगर, कांदपाडा, दहीसर, पुर्व, मुंबई येथे पोलीस चौकशी केली असता नापत्ता हा येथील पत्यावर जावून-येवून असल्याचे निष्पन्न झाले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे श्री. योगेश पुंडलिक खामकर हा श्री. सखाराम गोरे यांच्या संपकति असल्याचेही निष्पन्न झाले.
सखाराम गोरे यांच्या कडे अधिक तपास केला असता नापत्ता इसम हा त्यांच्या एम.आय.डी.सी, लोटे ता. खेड जि.रत्नागिरी येथील मैफिल हॉटेलमध्ये कामाला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे तपासिक अंमलदार पोहवा/1248 प्रमोद कांबळे यांनी दिनांक 19/09/2025 रोजी हॉटेल मैफिल एम.आय.डी.सी लोटे ता. खेड जि. रत्नागिरी या पत्यावर जावून खात्री केली असता नापत्ता इसम श्री. योगेश खामकर हे सुमारे 1 वर्षापासून श्री. सखाराम गोरे यांच्या हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला व त्यांच्याकडेच भाडयाने राहाण्यास असल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील तसेच पो.हवा/1248 प्रमोद कांबळे, शहर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.



