भाटघर येथे कृषि कन्यांकडून अझोला उत्पादनाचे यशस्वी प्रात्यक्षिक; पशुपालकांसाठी ठरणार वरदान

दापोली दि. ११ सप्टेंबर (सागर गोवळे) :- कृषि महाविद्यालय, दापोली अंतर्गत ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमा’ (RAWE) तर्फे भाटघर येथील वृक्षवली काजू फॅक्टरीजवळ अझोला (पशूखाद्य) उत्पादनाचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. स्थानिक शेतकरी श्री. प्रथमेश खोपकर यांच्या सहकार्याने कृषि कन्यांच्या गटाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. पशुधनासाठी अत्यंत पौष्टिक आणि अल्प खर्चात उपलब्ध होणाऱ्या अझोल्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अझोला निर्मितीसाठी ६ फूट × ४ फूट × १ फूट आकाराचा खड्डा तयार करून त्यात ताडपत्री अंथरण्यात आली. त्यात ४ ते ६ इंच स्वच्छ पाणी भरून ३ किलो शेण, ३ किलो माती आणि ३० ग्रॅम एसएसपी (SSP) यांचे मिश्रण ढवळून स्लरी तयार करून पाण्यात मिसळण्यात आली. ही स्लरी व्यवस्थित स्थिर झाल्यानंतर त्यात अझोला कल्चर सोडण्यात आले.
या प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाची शास्त्रोक्त पद्धत, त्याची दैनंदिन देखभाल आणि नियमित काढणी कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कमी खर्चात पशूंना उच्च प्रथिनेयुक्त खाद्य देण्याचा अझोला हा उत्तम पर्याय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रात्यक्षिकामुळे उपस्थित शेतकऱ्यांना अझोला लागवडीचे थेट प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
सदर उपक्रम दापोली कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रात्यक्षिकाबद्दल स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांनी कृषि कन्यांचे विशेष आभार मानले.



