रत्नागिरी

मंगळागौर पूजनाने नानल गुरुकुलमध्ये उजळला उत्साहाचा माहोल

रत्नागिरी दि. ११ सप्टेंबर : भारतीय संस्कृती आणि सणांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने रा. भा. शिर्के प्रशाला अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल’मध्ये मंगळागौरीचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेच्या प्रांगणात मंगळागौर पूजनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विधिवत माता मंगळागौरीच्या पूजनाने करण्यात आली. आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून करण्यात आलेल्या या पूजेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही सहभाग घेतला. पूजनानंतर पारंपरिक मंगळागौरीच्या गाण्यांच्या तालावर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांनी संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण केले. फुगडी, मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, झिम्मा पडसाळी यांसारख्या खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. या सांस्कृतिक उपक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांना पारंपरिक पद्धतीने दही-पोह्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला, ज्याचा सर्वच विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button