रत्नागिरी

ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती कार्यशाळा

रत्नागिरी दि. ११ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये नुकतीच झाली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचवावा आणि पुढील पिढीला या परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला तज्ज्ञ मूर्तिकार श्रीकांत ढालकर यांनी बालमुर्तिकारांना शाडूची माती कशी मळायची ते शिकवले. त्यांनी शाडूच्या मातीपासून साप, काजू आणि केळे सुंदर पद्धतीने बनवून दाखवले व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. नंतर गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडूच्या मातीचे आकार कसे बनवायचे आणि ते एकमेकांना जोडून गणपतीची मूर्ती पूर्ण कशी करायची याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. त्यांनी गणपतीची सुबक मूर्ती बनवली. विद्यार्थ्यांनी देखील सुंदर गणेशमूर्ती बनवल्या.

आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडविण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा गणेशमूर्ती बनवण्याचे कारण विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. इयत्ता चौथीतील विद्यार्थी उत्साहाने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांनी बालमूर्तिकारांचे कौतुक केले आणि मार्गदर्शक श्रीकांत ढालकर यांचा सन्मान केला.

शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अनिल गार्डी, प्रवीण मोरे, अमित वेदरे, नेहा राजेशिर्के तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button