रत्नागिरीराजकीय

संघटन मजबूत करा, बूथनिहाय पक्षविस्ताराला गती द्या; आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा : आ. रवींद्र चव्हाण

रत्नागिरी उत्तर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

चिपळूण दि. १० सप्टेंबर :- भाजप हा केवळ निवडणुका लढविणारा पक्ष नसून, सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम करणारे संघटन आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. पक्षाची खरी ताकद ही बूथवरील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक बूथ सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात यावा. बूथ समित्या सक्रिय असाव्यात, पन्नाप्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी नियमित संपर्क ठेवला जावा आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पक्षाचे विचार व केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी उत्तर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी केले.

रत्नागिरी उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक बूथवर पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन केले. तसेच कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर वर्षभर जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजे. सुख-दुःखात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. संघटनेतील प्रत्येक पद हे जबाबदारीचे आहे. पद मिळाले म्हणून काम संपत नाही, तर त्या पदाच्या माध्यमातून पक्षासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळते, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी उत्तर मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीचे रूपांतर व्यापक जनसंपर्कात करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि शासनाच्या योजना यांचा सातत्याने आढावा घेऊन त्यावर काम करण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

महिला, युवा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, शेतकरी, कामगार, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये पक्षाचा संपर्क वाढविण्याचे आवाहन करताना आ. चव्हाण यांनी नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत जोडण्यावरही भर दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात किमान काही नवीन नागरिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेले निर्णय आणि केंद्र व राज्य सरकारची विकासाभिमुख भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रभावी संवाद साधावा. सोशल मीडिया, प्रत्यक्ष जनसंपर्क, बैठका आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा विचार अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसते, तर संपूर्ण संघटनेची लढाई असते. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून संघटनेच्या विजयासाठी एकदिलाने काम केले पाहिजे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास कोणतेही राजकीय आव्हान पेलणे शक्य आहे, असा विश्वासही आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार संघटन मजबूत करून आगामी काळात पक्षविस्तारासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आ. प्रमोद जठार, आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, माजी आ. डॉ. विनय नातू, माजी आ. सूर्यकांत दळवी, भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, ओबीसी मोर्चा कोकण प्रदेश संघटक संतोष नलावडे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव प्रणाली सावर्डेकर, खेड ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद चाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button