रत्नागिरी

संस्कृतच्या सुरांनी दुमदुमले गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी दि. ९ सप्टेंबर : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संस्कृत विभागातर्फे संस्कृत दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते माजी संस्कृत शिक्षिका विशाखा पाटोळे यांचे “श्रीगणपत्यथर्वशीर्षम् – रसास्वादः” या विषयावरील व्याख्यान. त्यांनी अथर्वशीर्षातील प्रत्येक ओळ, शब्द आणि त्यामागील तात्त्विक विचारांचे अत्यंत बारकाईने तसेच रंजक विश्लेषण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपत्यथर्वशीर्षाचे हे विवेचन कालोचित आणि ज्ञानवर्धक ठरले.

कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्कृत दिनोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या गीतगायन, नाट्यवाचन, प्रश्नमंजूषा, अन्त्याक्षरी, सामान्यज्ञान चाचणी याविविध स्पर्धांमधील गुणवंत विजेत्यांना गौरविण्यात आले.

प्रथम वर्ष संस्कृत ते पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संस्कृतीची आणि संस्कृत भाषेची श्रीमंती प्रभावीपणे मांडली. ‘गरुडगमन तव’ या स्तोत्राचे गायन पदव्युत्तर प्रथम वर्षातील विद्यार्थिनी दीप्ती गद्रे, साक्षी शेवडे आणि पूर्वा खाडीलकर यांनी केले. ‘तज्ज्ञानाम् उपदेशः’ हा हास्यविनोदपूर्ण संवाद पदव्युत्तर द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कल्पजा जोगळेकर, मीरा काळे, अक्षरा भट, मनस्वीनाटेकर यांनी सादर केला. ‘मधुराष्टकम्’ या स्तोत्राचे गायन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी मधुश्री वझे आणि स्मितल बेंडे यांनी केले.

पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी वेदश्री बापट आणि तेजस्विनी जोशी यांनी ‘वार्तावली’मध्ये विनोदी बातम्या सादर केल्या. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी वैभवी जोशी हिने ‘जब दीप जले आना’ या मूळ हिंदी गीताचा संस्कृतानुवाद सादर केला.

द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी वैभवी जोशी, पूर्वश्री जावडेकर, आर्या मालगुंडकर, त्रिशला कांबळे यांनी संस्कृतदिनसंबंधी लघुसंवाद सादर केला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कीर्ती पुजारे, श्रावणी पालकर, आणि मधुरा जोशी यांनी ‘सरलभाषा संस्कृतम्’ हे गीत सादर केले. या गीतास प्रथम वर्षातील पुष्कराज गोडबोले याने हार्मोनियम साथ केली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शुभेच्छा दिल्या. संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका प्रीती टिकेकर यांनी कार्यक्रमाचेप्रास्ताविक आणि अतिथी परिचय करून दिला. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. मधुश्री वझे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संस्कृतमधून करत उपस्थितांची वाहवा मिळवली. कु. स्मितल बेंडे हिने आभार मानले. सदरकार्यक्रमाला संस्कृत विभागाचे विद्यार्थी, संस्कृत विभागातील प्रा. स्नेहा शिवलकर, संस्कृतप्रेमी श्री. विजय वाडिये उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button