रत्नागिरीसामाजिक

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याला जनजागृतीची ढाल

गोगटे- जोगळेकर महाविद्यालय; स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात सायबर जागृतीचा संदेश

रत्नागिरी दि. ९ सप्टेंबर : डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानांतर्गत पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे विशेष सायबर जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने आणि क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.

उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सायबर वॉरियर्स यांनी सादर केलेले ‘स्क्रीनच्या पलीकडे’ हे प्रभावी पथनाट्य. यामध्ये डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना कशाप्रकारे भीती दाखवून, पोलिस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून मानसिक दबाव निर्माण केला जातो आणि त्यानंतर आर्थिक फसवणूक केली जाते, हे नाट्यमय पद्धतीने सादर करण्यात आले.

फोटो व व्हिडिओ मॉर्फिंगच्या माध्यमातून व्यक्तींच्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये फेरफार करून त्यांचा गैरवापर, बदनामी किंवा ब्लॅकमेलिंग कशाप्रकारे केले जाऊ शकते, याबाबतही पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. पथनाट्यादरम्यान थांबा, विचार करा, पडताळा आणि मगच विश्वास ठेवा हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे तसेच संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना माझा डेटा व माझी जबाबदारी ही होती. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक आणि डिजिटल माहितीची जबाबदारी स्वतः स्वीकारून सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा ही केवळ तंत्रज्ञानाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सायबर वॉरियर्स यांनी उपक्रमाचे नियोजन, सादरीकरण आणि जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button