कृषीरत्नागिरी

वनोशी तर्फे पंचनदी येथे ‘एकात्मिक रोग व्यवस्थापना’वर प्रात्यक्षिक संपन्न

वनोशी तर्फे पंचनदी दि. ८ सप्टेंबर (सागर गोवळे) : येथील धातोंडी वाडी येथे ‘कृषी सखी’ गटामार्फत ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत परिसरातील प्रमुख शेती व फळपिकांवरील एकात्मिक रोग व्यवस्थापनावर (IDM) प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन वर्ग यशस्वीरीत्या पार पडला. पिकांवरील रोगांची वेळीच ओळख पटवून पर्यावरणपूरक व किफायतशीरपणे त्यांचे नियंत्रण कसे करावे, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

या प्रात्यक्षिकादरम्यान कृषी सखी गटातील विद्यार्थिनींनी भात, नाचणी, आंबा, नारळ आणि सुपारी या भागातील प्रमुख पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांची सविस्तर माहिती तक्ते व छायाचित्रांच्या साहाय्याने दिली:

भात: कडा करपा व जिवाणूजन्य पान करपा रोगाची लक्षणे सांगून निरोगी बियाणे वापरणे, रोपांमध्ये योग्य अंतर ठेवणे आणि नत्राचा (नायट्रोजन) अतिवापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला.

नाचणी: मान करपा आणि पानावरील करपा या रोगांची लक्षणे छायाचित्रांद्वारे स्पष्ट करण्यात आली.

आंबा: भुरी, अँथ्रॅकनोज व बांडगुळ या रोगांमुळे पाने, फुले व फळांवर होणारे परिणाम दाखवून बागेची स्वच्छता आणि शिफारशीत औषधांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले.

नारळ: कोंब कुजणे (Bud Rot) रोगापासून बचावासाठी पाण्याचा योग्य निचरा, बागेची स्वच्छता आणि संतुलित खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले.

सुपारी: फळकूज (कोलेरोगा) या घातक रोगाची लक्षणे आणि त्यावर वेळेवर करावयाच्या उपायांची माहिती दिली.

केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक, भौतिक आणि रासायनिक पद्धतींचा योग्य मेळ घालून रोग नियंत्रण करण्यावर प्रात्यक्षिकात भर देण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही विद्यार्थिनींनी केले.

मार्गदर्शन व आयोजन:

हे प्रात्यक्षिक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. परेश पोटफोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सखी गटातील विद्यार्थिनी कु. शबरी चव्हाण, कु. संजना जंगले, कु. मधुजा घडशी, कु. पायल मोरे, कु. रिंकू बाजीया, कु. तरला श्रीदेवी, कु. दिविलीयू, कु. देवीप्रिया पी. टी., कु. श्रीलया एम., कु. मुस्कान कसोटीया आणि कु. नित्या राज यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रात्यक्षिकाचा परिसरातील शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button