खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात २९ जुलै रोजी धम्म प्रबोधन प्रवचन मालिकेचा शुभारंभ!
बौद्धजन पंचायत समितीच्यावतीने विविध गाव शाखांमध्ये होणार वर्षावास कार्यक्रम

गणपतीपुळे दि. २५ जुलै (वैभव पवार) :- बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही “वर्षावास” या धार्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातील धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ बुधवार दिनांक २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या शुभदिनी वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीच्या अंतर्गत असलेल्या संस्कार समिती या उपसमितीच्या माध्यमातून समाजात धार्मिक जनजागृती करता यावी आणि धम्मप्रचार व प्रसाराचे काम जोमाने करता यावे, या मूळ उद्देशाने प्रतिवर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यंदाही या कार्यक्रमांतर्गत धम्म प्रबोधन प्रवचन मालिका होणार असून या प्रवचन मालिकेचा शुभारंभ वाटद खंडाळा येथील दिक्षाभूमी बुद्धविहारात २९ जुलैला सकाळी अकरा वाजता होणार असून या कार्यक्रमात करबुडे येथील धम्म अभ्यासक विजय जाधव हे प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभणार आहेत.
त्यानंतर विविध गावशाखांमध्ये वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये 23 ऑगस्ट रोजी जयभीमनगर सैतवडे येथे- प्रवचनकार रविकांत पवार ( मालगुंड ),सहा सप्टेंबर रोजी वाटद पूर्व येथे -प्रवचनकार ॠतुजा आंबुलकर (आंबेडकरवाडी- रत्नागिरी) 20 सप्टेंबर रोजी कोळीसरे येथे-प्रवचनकार संतोष कदम (बसणी), चार ऑक्टोबर रोजी कासारवेली येथे- प्रवचनकार प्रशांत जाधव( सडामिऱ्या), 18 ऑक्टोबर रोजी कपिलवस्तूनगर करबुडे येथे- प्रवचनकार वैभव पवार (मालगुंड), आणि अश्विन पौर्णिमा समारोप कार्यक्रम फणसोप येथे पूज्य भंते यांचे प्रमुख उपस्थितीत आणि प्रवचनाने संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना प्रत्येक गावशाखेतील पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि संस्कार समितीचे सर्व पदाधिकारी यांचेवतीने करण्यात आले आहे. रत्नागिरी येथे २१ जून रोजी झालेल्या जनरल बैठकीत वर्षावास कार्यक्रमाचे नियोजन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे प्रमुख पदाधिकारी, संस्कार समिती, गावशाखा पदाधिकारी व सभासद यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
त्यानंतर वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ २९ जुलै रोजी होत असून धम्म प्रबोधन प्रवचन मालिकेतील अन्य कार्यक्रम तालुक्यातील विविध गाव शाखांमध्ये मोठ्या उत्साही व दिमाखदार नियोजनात संपन्न होणार असल्याची माहिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार व संस्कार समितीचे प्रमुख पदाधिकारी यांचेवतीने देण्यात आली आहे.



