देव, घैसास, कीर महाविद्यालयात अर्थशास्त्रातील करिअरच्या संधींवर परिसंवाद

रत्नागिरी दि. २२ जुलै : देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मंदार जाखी (आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय, देवरूख) उपस्थित होते. अर्थशास्त्र विषयामध्ये पदवी घेतल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत याची सखोल आणि दिशादर्शक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
डॉ. मंदार जाखी यांनी करिअरची व्याख्या आणि अर्थशास्त्रातील बदलते प्रवाह यावर भाष्य केले. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नव्हे, तर स्व-विकास आणि शाश्वत प्रगती साधणे होय, हे स्पष्ट करत त्यांनी पारंपरिक नोकऱ्यांपासून ते आजच्या आधुनिक युगातील संधींचा आढावा घेतला. त्यानंतर चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन डॉ. जाखी यांनी सोप्या शब्दांत केले.
आजच्या जागतिक आणि डिजिटल युगात अर्थशास्त्र हा केवळ एक विषय राहिलेला नाही तर ते करिअरचे एक महादालन बनले आहे असे मत अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांनी प्रस्तावनेत मांडले. प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. विनय बावदने, कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. राखी जाधव, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. विनय कलमकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांसोबत इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रचिती घाणेकर (तृतीय वर्ष कला) हिने केले. प्रा. श्रुती भोसले यांनी आभार व्यक्त केले.



