सह्याद्री कला महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांचे मुंबईत चित्र प्रदर्शन
२१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान कलारसिकांना संधी

संगमेश्वर दि. १८ ( प्रतिनिधी ):- कोकणातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन २१ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान द आर्ट एन्ट्रन्स आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग फोयर, १४८, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई मुंबई येथे संपन्न होत असून. मुंबईतील कलारसिकांना अनेक कलाकारांच्या एकापेक्षा एक सुंदर कलाकृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कलारसिकांनी या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हयातील सावर्डेच्या सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या दूरदृष्टिपणामुळे संस्थेने सावर्डेच्या शिक्षण नगरीत दृककलेचे शास्त्रोक्त शिक्षण देणारे चित्र शिल्प कलामहाविद्यालय सन १९९३ पासून अत्यंत संघर्षमय परिस्थितीत सुरु केले. दृक कला ज्ञानदानाचे हे कलामहाविद्यालय केवळ कोंकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य कलामहाविद्यालय म्हणून आज कलाजगताला माहित आहे.
सह्याद्री कलामहाविद्यालयात केवळ कोंकणातील सर्वार्थाने वंचित असलेले, मुळात ज्यांच्या ध्यानीमनी सुप्त कलागुणांचा सुवास दरवळत असलेल्या बारा बलुतेदारांची मुले, इतकेच नव्हे तर बाहेरील जिल्हयातील, राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रवेश घेवून चांगल्या प्रकाराने शिक्षण घेवून नैत्रदिपक कामगिरी करीत असतांनाच कलामहाविद्यालयाचे संस्थेचे नाव देशपातळीवर आघाडीवर ठेवत आहेत. नावलौकिक वाढवित आहेत कलामहाविद्यालयातून आपला अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी देश परदेशात आर्ट स्टुडिओ, टी.व्हि., चॅनेल कलाध्यापक, कलासमीक्षक, पत्रकार शैक्षणिक संस्थेचे काम करीत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे.
या कलामहाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाबरोबर कलाकारांनी स्वतः जगाव कसे? आणि दुस-यांना जगवावे कसे? याबदद्ल वेगवेगळ्या प्रकाराने प्रात्यक्षिकासह शिक्षण दिले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहण्याचे सामर्थ्य देण्याचे काम हे कलामहाविद्यालय सदैव करीतच असते. म्हणूनच केवळ कोंकणातीलच नव्हे तर इतर विविध ठिकाणाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील अबोल, गरीब, वंचित आणि कलेची ज्यांना मनोमत इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना हे कलामहाविद्यालय वरदानच ठरत आहे.
या कलामहाविद्यालयात विद्यार्थी कलाशिक्षणाची कलासाधना करीत असताना आणि येथून कलाशिक्षण घेवून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना कलाजगताची माहिती व्हावी, म्हणूनच आजी- माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे, कलाप्रदर्शनाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कलाप्रदर्शनात विष्णू परीट, प्रकाश महिंदकर, रोहन पवार, संदिप ताम्हणकर, बुध्दभुषण सकपाळ, तुळशी भुवड, श्रुती सोमण, सिध्दार्थ भोवड, सौरभ साठे, चिन्मय वडपकर, निशा ओली, मकरंद राणे, ऋतिका शिरकर आणि प्रज्वल घडशी यांचा सहभाग आहे. या प्रदर्शनाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या कलाप्रदर्शनामध्ये सुंदर निसर्ग चित्रापासून ते सामाजिक जाणिवेपासून साकार झालेल्या कलाकृती ते तंत्राआर्ट पर्यंत असलेल्या चित्र – शिल्पाकृती आहेत. या कलाकारांच्या मन पटलावर उमटलेल्या विविध भावस्पर्शी स्पंदनाचा आस्वाद त्यांच्या कलाकृतीतील रंग, रेषा, आकार पोत, अवकाश यांच्या मनोवेधक रचनेतून घेता येईल. या कलाकारांना ज्यामुळे सदैव आनंद मिळत आहे तोच आनंद व्दिगुणित होवून कलारसिकांना निश्चितपणे मिळाल्यानंतर त्यांचेही जीवन आनंददायक होईल यात शंका नाही. कलाप्रेमी, कलारसिक, कलाकार यांनी या सर्वांचे कौतुक करावे, त्यांना आशीर्वाद देवून त्यांची पुढील कारकिर्द निश्चितपणे सुखकर होण्यासाठी त्यांना प्रेरणा दयावी असे आवाहन कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी केलं आहे.



