रायपाटणमध्ये आगटे पेट्रोल पंपाचे उत्साहात उद्घाटन; वाहनचालकांची गैरसोय दूर

रायपाटण दि. १६ (स्नेहल नलावडे ) :- इतिहास, कला-संस्कृती आणि ‘मंदिरांचे गाव’ अशी ओळख असलेल्या रायपाटणच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गुरुवारी (दि. १६ जुलै) गाठला गेला. रायपाटण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आगटे पेट्रोल पंपाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अस्मिता विष्णू आगटे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर वाहनधारकांनी नव्या सुविधेचे उत्स्फूर्त स्वागत करत पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. ओणी-अणुस्कुरा मार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रायपाटणमध्ये इंधन सेवा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी या मार्गावर कोळवण खडी येथेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची सुविधा उपलब्ध होती.
या पंपाचे मालक सत्यवान विष्णू आगटे यांच्या मातोश्री अस्मिता विष्णू आगटे यांच्या हस्ते पेट्रोल विभागाचे, तर त्यांचे मामा कामतेकर यांच्या हस्ते डिझेल विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमास रायपाटणचे सरपंच निलेश चांदे, उपसरपंच विजय जड्यार, माजी सरपंच राजेश नलावडे, श्री वडची आई देवस्थान न्यासाचे अध्यक्ष विनायक शेट्ये, आप्पा शेट्ये, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आण्णा पाथरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन नारकर, माजी सभापती दत्ताराम गोरुले, संदीप कोलते, मनोज गांगण, विलास गांगण, भास्कर सुतार, संदीप बारसकर, बाजीराव विश्वासराव, आप्पा साळवी यांच्यासह रायपाटण व पूर्व विभागातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, देवस्थानांचे मानकरी, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पेट्रोल पंपामुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांनाही बळकटी मिळणार आहे. या उपक्रमामुळे रायपाटणच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी सत्यवान आगटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



