राजापूर प्रांत कार्यालयात सुनावणीला गालबोट? पाचल ग्रामस्थांवर दबावतंत्राचा आरोप; चौकशीची मागणी

राजापूर, दि. १६ जुलै : रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात राजापूर प्रांत कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या सार्वजनिक सुनावणीला वादाचे गालबोट लागले आहे. सुनावणीदरम्यान पाचल येथील काही व्यक्तींनी कार्यालय परिसरात उपस्थित राहून विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व प्रतिनिधींवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप रायपाटण ग्रामस्थांनी केला असून, याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सुनावणी निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित असताना काही व्यक्तींनी कार्यालय परिसरात उपस्थित राहून रायपाटणच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी विविध गावांच्या प्रतिनिधींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून तो पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी सुनावणीच्या दिवशीचे प्रांत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने सुरक्षित ठेवून त्याची पडताळणी करावी, घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर सरपंच निलेश चांदे, तसेच मनोज गांगण, संतोष गांगण, प्रसाद देसाई, मंगेश पराडकर, कुणाल गांगण, सुहास गांगण, तात्या गांगण, विशाल गांगण, गोपीनाथ नवरे, जितेंद्र गांगण, निमेश बांबरकर आदींसह रायपाटण येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या तक्रारीमुळे रायपाटण अपर तहसीलदार कार्यालयाच्या प्रस्तावावरील सुनावणीला नवे राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले असून, राजापूर तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता प्रशासन या तक्रारीवर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



