ओरोस येथे एनसीसीच्या शिबिरात जांभेकर विद्यालयाचे सुयश

रत्नागिरी दि १३ जुलै : ओरोस येथील ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने सिंधुदुर्ग (ओरोस) येथे आयोजित करण्यात आलेले कॅट सी- 316 एनसीसी प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ३५० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले. यामध्ये सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी यश मिळवले.
शिबिरात विविध सांस्कृतिक व गुणदर्शन स्पर्धांमध्ये सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील कॅडेट भक्ती मांडवकर हिने एकल नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. समूह नृत्य स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. ड्रिल, रायफल फायरिंग, शारीरिक प्रशिक्षण, नकाशा वाचन, फील्डक्राफ्ट, शस्त्र हाताळणी तसेच विविध लष्करी कौशल्यांचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कॅडेट्सना लष्करी शिस्तीबरोबरच जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची प्रेरणा मिळाली.
शिबिरादरम्यान ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज एल. तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या एनसीसी एएनओ सौ. स्नेहल पावरी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांनी कॅडेट्सचे अभिनंदन केले.



