रत्नागिरी
कसोप-बनवाडी धरणात आंघोळीवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

रत्नागिरी दि. १२ जुलै : कसोप-बनवाडी येथील धरण परिसरात स्वच्छता व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंघोळीस बंदी घालण्यात आली असून, याबाबत ग्रामपंचायतीने सूचना फलकही लावला आहे. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून बाहेरील काही तरुण-तरुणी धरणात आंघोळीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना मज्जाव केल्यावर काही जणांकडून वादविवादही करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची तातडीने दखल घेत पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरण परिसराला भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सक्त ताकीद दिली. तसेच, यापुढेही बंदी आदेशाचे उल्लंघन करून धरणात आंघोळीसाठी येणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



