
रत्नागिरी दि. १२ जुलै : रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलाच्या वतीने नाचणे गुरूमळी येथे भातलावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे आणि पारंपरिक शेतीची जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी थेट चिखलात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांना सुदेश निंवळकर, श्रेयस फटकरे, प्रियांका नाखरेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी भाताची रोपे काढली आणि नंतर लावणी केली. या उपक्रमाचे कौतुक करताना शेतकरी राजू सावंत म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढीला शेती आणि मातीशी जोडणारा हा पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे, ज्यामुळे मुलांमध्ये कष्टाची जाणीव आणि अन्नाबद्दल आदर निर्माण होईल.



