
रत्नागिरी दि. ८ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष समाजशास्त्र विभागातील विद्यार्थांनी व्यवसायभिमुख कौशल्य अभ्यासक्रमाच्या विषयासाठी भाट्ये समुद्रकिनारा येथील स्वच्छता संदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार विषय अध्ययनासोबत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसन होणे आवश्यक आहे. यासाठी समाजशास्त्र विभागाने सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती हा अभ्यासक्रम तयार केला. विद्यार्थ्यांना सर्वेक्षण, मुलाखती, संशोधन व अहवाल लेखन याचे कौशल्य निर्माण होणे हे त्याचे उद्देश आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या कौशल्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन तेथील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषणाची स्थिती आणि पर्यटकांच्या सवयी यांवर आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी केवळ समस्येची मांडणी न करता, समुद्रकिनारा कायमस्वरूपी कचरामुक्त आणि निसर्गरम्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या व व्यावहारिक उपाययोजनांची शिफारस आपल्या अहवालात केली आहे.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रा. सचिन सनगरे (समाजशास्त्र विभाग), प्रा. अभिजित भिडे, प्रा. निलेश जोशी, प्रा. सारिका माळी, प्रा. मनस्वी लांजेकर, डॉ. विराज चाबके या सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला.
हा कचरा आढळला
सिंगल यूज प्लास्टिक- यामध्ये पाण्याचा बाटल्या, शीतपेयांचे कप, प्लास्टिकचे चमचे, आणि खाद्यपदार्थांची वेष्टने यांचा समावेश सर्वात जास्त होता.
पर्यटनाशी संबंधित कचरा- पर्यटकांनी किनाऱ्यावर टाकलेले पाण्याच्या बाटल्यांचे आणि गुटख्यांची पाकिटे, अन्नपदार्थांचे उरलेले तुकडे आणि थर्माकोलच्या डिशेस.
सागरी कचरा- समुद्राच्या लाटांसोबत वाहून आलेले आणि किनाऱ्यावर साचलेले जुने मासेमारीचे जाळे, प्लास्टिकचे तुकडे, आणि नायलॉनच्या दोऱ्या.
काचेच्या बाटल्या- मद्यपींनी किंवा पर्यटकांनी टाकलेल्या काचेच्या बाटल्या, ज्या फुटल्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक मच्छीमारांना इजा होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.
कचरा साचण्यामागील प्रमुख कारणे
पर्यटकांची बेजबाबदार वृत्ती- किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणारे अनेक पर्यटक कचराकुंडीचा वापर न करता प्लास्टिक आणि इतर कचरा थेट वाळूतच टाकून देतात.
कचराकुंड्यांची अपुरी संख्या- किनाऱ्याच्या मुख्य भागाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पुरेशा डस्टबीन उपलब्ध नसणे.
अहवालातील शिफारस- भाट्ये किनाऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी पर्यटकांमध्ये ‘नो प्लास्टिक झोन’ विषयी जनजागृती करणे, किनाऱ्यावर ठिकठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी डस्टबीन्स ठेवणे आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने ‘कचरामुक्त किनारा समिती’ स्थापन करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी, पर्यटकांनी आपला सागरकिनारा कचरामुक्त राहील यासाठी नियमाचे पालन केले पाहिजे.
ओशन सोसायटीच्या विद्यमाने स्वच्छता अभियानही
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि ओशन सोसायटी ऑफ इंडिया (कोची) यांच्या संयुक्त विद्यमाने सागर किनारा स्वच्छता उपक्रमात गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाने सक्रिय योगदान दिले. वरिष्ठ महाविद्यालय व अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता न करता, तेथील कचऱ्याचे स्वरूपानुसार त्याचे वर्गीकरण, मापन व पुढील कार्यासाठी नियोजन करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि समुद्रकिनाऱ्यांचे वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि ‘ओशन सोसायटी ऑफ इंडिया’च्या वतीने देशभरात हे अभियान राबवले जात आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नोंदवलेला सक्रिय सहभाग आणि केलेले संशोधन हे स्थानिक पातळीवर किनारपट्टी संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक आणि संशोधनात्मक कार्याचे शैक्षणिक क्षेत्र आणि पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.



