क्रीडारत्नागिरी

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

चिपळूण दि. १६ : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २६ ते २८ जून २०२६ या कालावधीत चिपळूण येथील कै. राजाभाऊ रेडीज सभागृहात पार पडणार असून उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट पुरुष, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा आठ गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. सन २०२६-२७ या हंगामातील ही पहिली स्पर्धा असल्याने सर्व खेळाडूंनी जिल्हा असोसिएशनकडे वार्षिक नोंदणी शुल्क रुपये ५० जमा करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटासाठी रुपये १५०, पुरुष दुहेरी गटासाठी रुपये २००, तर कुमार, कुमारी, किशोर आणि किशोरी गटासाठी रुपये १०० प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक असून, त्यापेक्षा कमी प्रवेशिका असल्यास संबंधित गटाची स्पर्धा रद्द करण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व शुल्क मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तालुका प्रतिनिधीकडे जमा करावेत. तसेच स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट अथवा पांढरा शर्ट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. पुरुष दुहेरी गटातील सामने यंदापासून चार बोर्डांचे तीन सेट या पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर यांची प्रमुख पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी आणि शैलेश वाघाटे हे सहाय्यक पंच म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धा प्रमुख म्हणून मोहनशेठ मिरगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, कार्यवाह प्रभंजन पिंपुटकर, कोषाध्यक्ष शेखर सावले, तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, ज्येष्ठ सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद सप्रे आणि खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button