कृषीमहाराष्ट्ररत्नागिरी

१५ जूनपर्यंत पेरणीची घाई नको!; १८ जूननंतर पावसाचा जोर वाढणार

मुंबई दि. ८ :- मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमीच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

१५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, असे अद्याप दिसत नाही. हवामान कोरडे होणार असल्यामुळे पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

कधी वाढू शकते पावसाचे प्रमाण ?

१८ जूननंतर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जूनअखेरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची सकारात्मक शक्यता दर्शविण्यात आली आहे.

कोकण, घाटमाथ्यावर कोसळणार

पुढील तीन ते चार दिवसांत कोकण आणि घाटमाथा भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची चांगली शक्यता आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या हवामान बदलांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी मान्सूनची प्रतीक्षा करत आहे. मात्र, हे अल निनोचे वर्ष आहे. सरासरी २२ टक्के पावसाची शक्यता असली, तरी मराठवाडा व इतर दुष्काळप्रवण भागात दुबार पेरणीची वेळ येऊ नये हा प्रयत्न राहणार आहे. कमी पावसात जास्तीतजास्त उत्पादन व कमीत कमी नुकसान कसे होईल, यावर सरकारचा भर असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button