रत्नागिरी

मार्च एप्रिलचा शिक्षकांना अद्याप पगार नाही; रत्नागिरी जिल्ह्यात भोंगळ कारभार

संगमेश्वर दि. १७ ( प्रतिनिधी ):- शासकीय यंत्रणेच्या किंबहुना, तांत्रिक प्रणालीच्या विळख्यात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च एप्रिल महिन्याचा अद्याप पगार न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.

संच मान्यता आणि शालार्थ प्रणाली यामध्ये पदांच्या संख्येत फरक असल्याने, संबंधित कॉलेजची पगार बिले रत्नागिरी वेतन अधीक्षकांना फॉरवर्ड न होता थेट, कोल्हापूर उपसंचालक यांच्या लॉगिनला गेली. ही बाब गेले सहा महिने घडत आहे.ही बिले कोल्हापुरहून अप्रू करून पुन्हा मुख्याध्यापक लॉगिन ला आल्यावर ,ती पुन्हा वेतन अधिक्षक कार्यालयात फॉरवर्ड करावी लागतात.ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि काल मर्यादेत शासकीय यंत्रणेने राबवणे गरजेचे होते.परंतु हे काम निद्रिस्त यंत्रणेकडून वेळेत,स्वतःहून न झाल्याने,सगळी कागदपत्रे घेऊन कोल्हापूरला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच खेटे मारावे लागले.हे संपूर्ण कामाकाज खरतर शासकीय यंत्रणेचे होते. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांनी कोल्हापूर स्व खर्चाने वाऱ्या करून पूर्ण केल्यावर मार्च एप्रिलचा पगार करण्यासाठी निधीच नसल्याची धक्कादायक बाब रत्नागिरीच्या वेतन अधीक्षिका सौ. किशोरी करमुसे सांगत आहेत.

मे ची पगार बिले अन्य प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांची जायची वेळ आली तरी या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचा मार्च आणि एप्रिलचा पगार करण्यात वेतन अधीक्षक कार्यालय रत्नागिरी अपयशी ठरले आहे.किंबहुना वेळेत निधी न मागवल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

शिक्षकांची असलेली कर्ज, त्याचे भरावे लागणारे हप्ते, एल.आय्.सी चे हप्ते,पतपेढ्यांमधील व्यवहार व अन्य आर्थिक व्यवहार या साऱ्यालाच या कुर्म गतीने काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेचा फटका बसला आहे.या साऱ्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयांना गेली पाच ते सहा महिने ही झळ लागत आहे.या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित शासकीय वरिष्ठ अधिकरी दुर्लक्ष करत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.ज्या चुका शिक्षकांनी सुधारायच्याच नाहीत त्याचं,गोष्टींबद्दल शिक्षकांचा पगार उशिरा करून वेठीस धरले जात आहे.

शालार्थ प्रणाली ही शासनाचीच आणि,संच मान्यता देखील शासनाचीच मग यामधील दुरुस्ती शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ आणि वेळेवर न केल्याने शिक्षकांना उपास मारीची वेळ आली आहे.मार्च,एप्रिल चा निधी शिक्षण आयुक्त कार्यालयातून केव्हाच शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होत आहे.मग रत्नागिरी जिल्ह्याला निधी का मिळाला नाही? याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.जून महिना आला तरी,त्या शिक्षकांच्या पगाराविना पोटाला बसत असलेला पिळ निद्रिस्त् अधिकारी आणि शासनाला केव्हा कळणार असा सवाल उपस्थित होत आहे.एकंदरच ह्या परिस्थीमुळे शिक्षकांकडून संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button