रत्नागिरीसामाजिक

गरीब कुटुंबाला घर बांधून देण्याचा निश्चय; देवरुखातील भागवत बंधुचे औदार्य!

संगमेश्वर दि. १४ ( प्रतिनिधी ):- जेव्हा सज्जनशक्ती मनावर घेते तेव्हा कोणतेही कठीण काम सहजरित्या होऊ शकते हा अनुभव देवरुखवासीयांना येत आहे. देवरुखच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील प्रभाकर कदम यांचे गरीब कुटुंब अतिशय दुरावस्था असलेल्या घरात राहत होते. ही गोष्ट देवरुखचे नगरसेवक रुपेश भागवत यांच्या निदर्शनास आली. त्यांनी शासकीय योजनेतून घर बांधण्यासाठी प्रयत्न केले पण काही कायदेशीर अडचणींमुळे शासकीय योजना प्रभाकर कदम यांना मिळू शकत नव्हती. असे असले तरीसुद्धा रुपेश भागवत यांनी त्यांचे जेष्ठ बंधू आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदानंद भागवत यांच्याशी हा विषय मांडला आणि दोन्ही भागवत बंधूंनी स्वतः मदतीचा हात पुढे करत समाजातील सज्जनशक्तीला हाक देऊन प्रभाकर कदम यांना घर बांधून देण्याचा निश्चय केला.

त्यांनी देवरुख मधील नागरिकांना तसेच आपल्या मित्र व नातेवाईकांना यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आणि या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. आंबेडकर नगर मधील बांधवांनी देखील यासाठी मदत केली. गुरुवार दिनांक १४ मे रोजी सदानंद भागवत, रुपेश भागवत आणि अन्य मदत करणाऱ्या नागरिकांच्या उपस्थितीत नवीन घर बांधण्याचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. आता चांगले राहते घर मिळण्याचे कदम कुटुंबियांचे स्वप्न सज्जनशक्तीच्या मदतीने साकार होणार आहे. एखाद्या पीडित नागरिकाचे संपूर्ण घर समाजातील दानशूर व्यक्तींनी बांधून देणे अशी घटना देवरुख मध्ये कदाचित पहिल्यांदाच घडत असेल. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button