क्रीडारत्नागिरी

बेनगी चॅम्पियन ट्रॉफी २०२६ मोठ्या दिमाखात संपन्न

‘श्री महाकाली समर्थ, पावस’ संघ विजेता

राजापूर, ता. १२ : बेनगी नागलेवाडी येथे ‘शंतनु इन्फोटेक प्रा. लिमिटेड’ पुरस्कृत व ‘घुरडेश्वर युवा क्रिकेट संघ’ आयोजित ‘बेनगी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’ ही क्रिकेट स्पर्धा ९ ते ११ मे दरम्यान उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात पावस येथील ‘श्री महाकाली समर्थ’ संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामना ‘श्री महाकाली समर्थ, पावस’ आणि ‘जे.सी.सी. खालचा भंडारवाडा, भालावली’ या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. अष्टपैलू खेळाच्या जोरावर पावस संघाने विजय मिळवत चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील विजेत्या संघाला ४५ हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला २७ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला.

स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार अहमद नाखवा याला मिळाला. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रथमेश भोसले (जे.सी.सी. भालावली), तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून अरफान नाखवा यांचा गौरव करण्यात आला. यजमान बेनगी संघाच्या अभि वारीक याने एका सामन्यात एकही धाव न देता ५ गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम करत विशेष लक्ष वेधले.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मैदानावरील पॅव्हेलियन उडून गेले. तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दोन दिवसांचे यूट्यूब थेट प्रक्षेपण बंद ठेवावे लागले. मात्र आयोजकांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. पहिल्या दिवशी ‘रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह’च्या माध्यमातून श्री. सौरभ मयेकर यांनी सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले.

बक्षीस वितरण समारंभाला बेनगीचे पोलीस पाटील श्री. प्रमोद वारीक, श्री. काशिनाथ नागले, श्री. विलास नागले, श्री. प्रकाश नागले, श्री. सुधाकर वारीशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन श्री. योगेश खडपे यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘घुरडेश्वर युवा बेनगी नागलेवाडी’च्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विकास वारीक सर यांनी स्पर्धेचे प्रायोजक श्री. संदीप बिर्जे यांचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button