कोकणात वादळी वाऱ्याचा हाहाकार; आंबा बागायतदार संकटात
तात्काळ नुकसान भरपाई देण्याची बाळ माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी दि. १० :- कोकण किनारपट्टीवर शनिवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शनिवार, ९ मे २०२६ रोजी झालेल्या या वादळामुळे अनेक ठिकाणी आंब्याची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर तयार झालेला आणि कच्चा आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आंबा उत्पादकांना सरसकट आणि तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आंबा उत्पादक आधीच त्रस्त होते. अशातच मोसमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या वादळाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे उत्पन्न या वादळामुळे धोक्यात आले असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही विनंती बाळ माने यांनी शासनाकडे केली आहे.


