रत्नागिरीतील महत्वपूर्ण पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

रत्नागिरी दि. २२ : शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांची पाणीटंचाईच्या झळांपासून सुटका होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून मिळालेल्या १६ कोटी रुपयांच्या निधीतून या धरणाच्या नूतनीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे शहरवासीयांना पावसाळ्यानंतर नैसर्गिक उताराने पाणी मिळणार असून, उन्हाळ्यात सोसाव्या लागणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांपासून सुटका होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पानवल धरणाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गळती होत होती. धरणात अपेक्षित पाणीसाठा होत नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत होता. हे लक्षात घेऊन प्रशासनाने दुरुस्तीचा आराखडा तयार केला होता. या कामासाठी १६ कोटी रुपयांच्या या विशेष प्रकल्पांतर्गत धरणाच्या भिंतीचे ग्राउटिंग करून गळती रोखणे आणि सांडव्याची तांत्रिक दुरुस्ती करणे, गाळ काढणे या कामांना प्राधान्य देण्यात आले. जलसंपदा विभागाने हे काम पूर्ण केले असून, धरणाची गळती पूर्णपणे थांबली आहे. सध्या धरणाच्या मुख्य भिंतीचे आणि स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तांत्रिक कामे सुरू आहेत. धरणातील गाळ उपसणे आणि मुख्य पाणीपुरवठा वाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

