पुण्यात ‘महाराष्ट्र गौरव सन्मान–२०२६’ ने प्रा. शैलेंद्र प्रभुदेसाई यांचा गौरव; तंटामुक्ती कार्याची राज्यस्तरीय दखल

राजापूर दि. २० : कुंभवडे गावचे सुपुत्र आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर येथील वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्या. मा. शैलेंद्र बापू प्रभुदेसाई यांना पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘महाराष्ट्र गौरव सन्मान–२०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे कला, शिक्षण, समाजसेवा, शेती व उद्योजकता या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. २०२२ ते २०२५ या काळात कुंभवडे गावचे ‘तंटामुक्त अध्यक्ष’ म्हणून सलग तीन वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळत समाजात शांतता व सलोखा निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तंटे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले असून, स्थानिक पातळीवर वाद मिटवण्याचा आदर्श नमुना त्यांनी उभा केला आहे.
सामाजिक सौहार्द टिकवून ठेवत न्याय्य व पारदर्शक पद्धतीने प्रश्न सोडवण्याची त्यांची कार्यशैली विशेष कौतुकास्पद ठरली आहे.सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत गेल्या ५ वर्षांपासून ते दर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना १२ वी नंतरच्या करिअरसाठी ते मोफत समुपदेशन व मार्गदर्शन करून त्यांची दिशा स्पष्ट करत आहेत.
प्रा. प्रभुदेसाई हे एक उत्कृष्ट निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणूनही सुपरिचित आहेत. अनेक शासकीय व सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांनी आपल्या वाणीने कार्यक्रमांची शोभा वाढवली आहे. तसेच, २०२१ पासून एलआयसी (LIC) प्रतिनिधी म्हणून कार्य करताना त्यांनी ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्रा. प्रभुदेसाई यांच्या कार्याचा विशेष पैलू म्हणजे शिक्षणासोबतच संशोधन व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे बहुआयामी योगदान. अलीकडेच त्यांच्या नावावर एक संशोधनाधारित पेटंट मंजूर झाले असून, नवोपक्रमशील विचारसरणी व संशोधनवृत्तीची ही मोठी दखल मानली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करणे आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचा विकास घडवणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा. गणेश विटकर व सचिव मा. तेजस्विनी दिवटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार उपस्थित होते.
प्रा.प्रभुदेसाई यांनी हा सन्मान महाविद्यालय, सहकारी मित्र, विद्यार्थी व कुंभवडे गावातील व तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या पत्रकार बंधुच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले. पुढील काळातही कला , शिक्षण व समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल समाजातील विविध स्तरावरून त्याचे अभिनंदन केले. या गौरवामुळे राजापूर तालुक्याच्या कला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचा ठसा राज्यभर उमटत आहे.

