वणवा विझवताना होरपळून धनगरवाडीतील ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर दि. २३ : तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतातील वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. धोंडू विठ्ठल फांडे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडू फांडे हे मुर्शी मावळत धनगरवाडी येथील रहिवासी होते. त्यांचा वावर नेहमी गवत काडी आणि कवळकाटा भडकंबा या भागातील ‘झिल्याचे पाणी’ परिसरात असायचा. शनिवारी या परिसरात अचानक वणवा (आग) लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही आग विझवण्यासाठी ते घटनास्थळी गेले होते.
कुटुंबियांनी शोध घेताच समोर आला धक्कादायक प्रकार
बराच वेळ झाला तरी धोंडू फांडे घरी परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि भावाने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना, ते आगीत गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर उताणे पडलेले आढळले.
रुग्णालयात मृत घोषित
कुटुंबियांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना ‘मृत’ घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी साखरपा पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यू (AD) क्रमांक ३०/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


