मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाने बोटींची तपासणी करावी -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी, दि. २३ : मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग यांनी संशयास्पद बोटींची तपासणी करावी. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल दुकानांची तपासणी करुन अंमली पदार्थ तसेच बंदी असणारी औषधे विकली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप, प्रांताधिकारी जीवन देसाई, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर आदी उपस्थित होते.
श्री. बगाटे यांनी सविस्तर आढावा दिला. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, मच्छीमार बोटींवर नेपाळी कामगांराच्या अंमली पदार्थांच्या नशेत अपघात घडले आहेत. त्याबाबत त्यांच्याकडे येणारा स्त्रोत तपासा. त्यासाठी मच्छीमारांची मदत घ्यावी. पोलीसांनी पेट्रोलिंग वाढवून आपले गोपनीय नेटवर्क वाढविले पाहिजे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. शिक्षकांनाही सतर्क करावे. कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क रहावे. अंमली पदार्थ विरोधात जास्तीत जास्त कारवाया झाल्या पाहिजेत, त्यासाठी सर्वांनी अलर्ट मोडवर काम करावे.



