रत्नागिरीराजकीय

कुणबी नेते व उबाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर भाजपाच्या वाटेवर!

उबाठासेनेला केला जय महाराष्ट्र

देवरुख दि. १६ ( सुरेश सप्रे) :- कोकणातील विषेशताछ रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख व कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते येत्या बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हाती आली आहे.

सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजातही त्यांचा चांगला प्रभाव आहे. सन २०१९ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवित तात्कालिन मंत्री भास्कर जाधव यांना जोरदार टक्कर दिली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी उबाठासेनेत परतले होते. त्यांना जिप निवडणूकीत हार पत्करावी लागली होती. तेव्हापासून ते पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. आता कुणबी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करत समाजातील वंचीतांचा आधारवड असलेल्या सहदेव बेटकरांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयामुळे जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा मानला जात आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून हातीआलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी ठाकरे सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना जोर आला होता. त्यातच उबाठाकडून जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून मुंबई स्थित उद्योजक व विनायक राऊत यांचे समर्थक सुरेश कदम यांची नवीनच नेमणूक करत कुणबी समाजाच्या नेत्याचे पंख कापण्यात आले असल्याची भावना कुणबी समाजाच्या कार्यकर्तेमध्ये चर्चा सुरू झाली असतानाच धडाडीचे नेते सहदेव बेटकर उबाठासेनेला रामराम करून भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याचे वृत्ताने अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आता हाती आलेल्या या माहीतीनुसार उद्या बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहदेव बेटकर व समर्थक यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपला रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button