रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता; आंबा व काजू बागायतदारांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी दि. ११ : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ११ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पर्जन्यमान होण्याची शक्यता नाही. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, १२ फेब्रुवारीपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आंबा आणि काजू पिकाचे नियोजन
सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांच्या बुंध्याला ‘बोर्डो पेस्ट’ लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून खोडाची साल तडकू नये. आंबा पिकामध्ये फळधारणा झाली असल्यास प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच, आंबा मोहोर आणि फळांचे तुडतुडे, फुलकिडे व फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार कीटकनाशकांची फवारणी आणि ‘फळमाशी रक्षक सापळे’ लावण्याचे आवाहन केले आहे. काजू पिकावर ‘टी मोस्किटो बग’ (काजूवरील ढेकण्या) आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी करणे आवश्यक आहे.
भाजीपाला आणि इतर पिके
भुईमूग पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून उष्ण व दमट हवामानामुळे त्यावर ‘टिक्का’ आणि ‘तांबेरा’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा डिफेनकोनाझोलची फवारणी करावी. भाजीपाला पिकांमध्ये फुलकिडे व पांढरी माशी रोखण्यासाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नारळ आणि सुपारीच्या माडांना जमिनीच्या मगदुरानुसार ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आणि नारळाच्या पाच वर्षांवरील माडांना खतांची तिसरी मात्रा देऊन लगेच पाणी द्यावे.
पशुपालनासाठी विशेष काळजी
वाढत्या तापमानाचा फटका जनावरांना बसू नये, यासाठी पशुपालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. जनावरांना दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे. कलिंगड पिकाबाबत माहिती देताना, प्रखर सूर्यप्रकाशापासून फळांचे रक्षण करण्यासाठी ती भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.



