रत्नागिरीसामाजिक

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा, नाविन्यपूर्ण उपक्रम “मिशन जीवन”

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरु केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जसे दुर्गम भागामधील खेडो-पाड्यात व वाडी-वस्तीत अनेक ज्येष्ठ नागरिक हे व एकाकी राहत आहेत व आपले जीवन देखील एकाकी जगत असून त्यांना अनेक सामाजिक, भावनिक तसेच दैनंदिन स्वरुपाच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या निदर्शनास आले.

या वास्तवाची पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दखल घेत, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा निर्धार करून “मिशन जीवन” हा नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम दिनांक 13/09/2025 पासून राबविण्यात येत आहे.

या “मिशन जीवन” अंतर्गत रत्नागिटी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे.

आतापर्यंत 50,000 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा डेटा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे संकलित करण्यात आला आहे व सुमारे 1,000 पोलीस पाटील व पोलीस अधिकारी /अंमलदार यांनी या या “मिशन जीवन” अंतर्गत सक्रिय सहभाग घेतला आहे.

या संकलित माहितीच्या आधारे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जन्मतारखा नोंदविण्यात आल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात तसेच पोलीस अधीक्षक, रत्नागिटी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या स्वाक्षरीचे वाढदिवस शुभेच्छा पत्र प्रदान करण्यात येते.

दुर्गम भागामधील खेडो-पाड्यात व वाडी-वस्तीत राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने रत्नागिटी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहानुभूतीपूर्वक त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत.

“मिशन जीवन” च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा संदेश देण्यात येत आहे की ते कुठेही एकटे अथवा दुर्लक्षित नाहीत. त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगी तसेच जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव त्यांच्या सोबत आहे.

या “मिशन जीवन” अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2026″ रोजी, नववर्षाच्या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने लांजा व संगमेश्वर तालुक्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस 01 जानेवारी रोजी होता, त्यांचा एक अनोखा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांनी स्वतः उपस्थित राहून सहभाग घेऊन साजरा केला.

“मिशन जीवन” अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्या व अडचणी निर्भयपणे पोलीस प्रशासनापर्यंत मांडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचण्याचा व त्यांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्माननीय व आनंददायी बनविण्याचा संकल्प रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केला असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button