रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात अपिलात आरोपींची निर्दोष मुक्तता
ॲड. अमित अनंत शिरगावकर यांचा यशस्वी युक्तिवाद; ॲड. बाबासाहेब परुळेकर यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी दि. १३ :- रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल अपिलात ॲड. अमित अनंत शिरगावकर यांनी केलेल्या प्रभावी व कायदेशीर युक्तिवादाच्या आधारे चौकशी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपी किशोर देवजी चांदे, शुभम राजेश चांदे, राजेश देवजी चांदे, आदित्य राजेश चांदे (सर्व रा. देवपाट, कसबा संगमेश्वर) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने चौकशी न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत आरोपींची सर्व आरोपांतून मुक्तता केली.
या प्रकरणात चौकशी न्यायालयाने आरोपींना दोषी धरत शिक्षा सुनावली होती. मात्र, सदर निर्णयाविरुद्ध आरोपींच्या वतीने ॲड. अमित अनंत शिरगावकर यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले. अपिलाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती, अभियोजनातील त्रुटी तसेच पुराव्यांच्या अविश्वसनीयतेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
सत्र न्यायालयाने सर्व बाबींचा सखोल विचार करताना असे नमूद केले की, अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध दोष संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. तपासातील गंभीर त्रुटी व साक्षीतील विरोधाभास लक्षात घेता संशयाचा फायदा आरोपींना देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या कारणास्तव सत्र न्यायालयाने दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी चौकशी न्यायालयाचा दोषनिर्णय रद्द ठरवत आरोपींची निर्दोष मुक्तता जाहीर केली. या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संपूर्ण प्रकरणात ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी ॲड. अमित अनंत शिरगावकर यांना मोलाचे मार्गदर्शन केले.



