कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्यांच्या कलाकृतीत उमटते : वैभव खेडेकर

संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- कलाकाराचे मन हे संवेदनशील असते. त्याच्या अंतर्मनात डोकावल्यानंतर त्याने रेखाटलेल्या कलाकृतीचा खरा अर्थ समजतो. कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्याच्या कलाकृतीत उमटत असते, असे प्रतिपादन खेडचे माजी नगराध्यक्ष आणि राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कलादालनाला भेट दिल्यानंतर येथील कलाकृतींची पाहणी करताना वैभव खेडेकर हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, स्नेह ज्योती विद्यालयचे उत्तम कुमार जैन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, करण खेडेकर, राजवैभव पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले, दिनेश अंब्रे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शाळांना आपण भेटी दिल्या मात्र शाळेला जोडून असे भव्य कलादालन असणारे पैसा फंड हायस्कूल पाहून येथे कलेची आगळीवेगळी चळवळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कला शिक्षणाचा पाया येथे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो, हे अभिनंदनीय आहे. कलादालनात असणाऱ्या सर्वच चित्रांची आणि शिल्पांची वैभव खेडेकर यांनी बारकाईने पाहणी करून त्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम हे स्वतः कलासक्त आहेत. सह्याद्री कला महाविद्यालय आणि त्यांचे कलादालन भव्य दिव्य आहे. कलादालनाला भेट दिल्यानंतर अनिरुद्ध निकम म्हणाले की, पैसा फंड येथील अनेक विद्यार्थी आमच्या सह्याद्री कला महाविद्यालयात उच्च कला शिक्षणासाठी येतात, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एवढेच नव्हे तर पैसा फंडचे विद्यार्थी असणारे अवधूत खातू हे आमच्या कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात, ही या संस्थेसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे, असे निकम यांनी नमूद केले.
स्नेह ज्योती अंधविद्यालयाचे उत्तम कुमार जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कलाकारांनी रेखाटलेल्या येथील कलाकृती आपण काही पुस्तकांची मुखपृष्ठ म्हणून पाहिल्या आहेत. येथील कलाकृती एकापेक्षा एक सुंदर असून व्यापारी पैसा फंड संस्थेने विद्यार्थ्यांची कला जोपासण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला वर्ग आणि कलादालनाचा जो उपक्रम हाती घेतला, ही खरंतर काळाची गरज आहे.


