रत्नागिरी

एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी दि. ९ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय अंतर्गत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र व भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय, (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळा उत्साहात पार पडली. समारोप सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. गोपीकृष्ण रघु यांनी संस्कृत भाषेची पौराणिक महत्ता व आधुनिक युगातील उपयुक्तता स्पष्ट केली.

याकरिता गोगटे–जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग आणि संस्कृत शिक्षक मंडळाचे सहकार्य लाभले. उद्घाटनावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचे स्वरूप व शिक्षकांसाठी असलेली उपयुक्तता स्पष्ट केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. रत्नागिरीचे दीपक मेंगाणे यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षकांनी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई यांनी कार्यशाळेची शिक्षकांच्या दृष्टीने असलेली आवश्यकता मांडली.

उद्घाटन सत्रात संस्कृत भारती गीता शिक्षण केंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी अध्यापनात संस्कृत भाषेचा भाषिक व शास्त्रीय अंगाने प्रभावी वापर करण्यावर भर दिला. अध्यक्षीय भाषणात गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख व कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी सरलमानक संस्कृत कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा कशी प्रिय होईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.

यानंतरच्या सत्रांमध्ये शिरीष भेडसगावकर यांनी सरलमानक संस्कृतची संकल्पना स्पष्ट केली. डॉ. कल्पना आठल्ये यांनी अध्ययन–अध्यापनाच्या दृष्टीने तिचे स्वरूप विशद केले. प्रा. अविनाश चव्हाण व प्रा. पूर्वा चुनेकर यांनी प्रौढांसाठी संस्कृत भाषा सोप्या व आकलनसुलभ पद्धतीने कशी वापरता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. माधवी जोशी यांनी शैक्षणिक व व्यवहारिक क्षेत्रात सरलमानक संस्कृतच्या अंमलबजावणीची उदाहरणांसह माहिती दिली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button