लोटे येथील पी.एफ.ए.एस रसायन उत्पादनाविरोधात अनुज जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; २६ जानेवारीला आत्मक्लेश करण्याचा इशारा!

रत्नागिरी दि. १ :- रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले पी.एफ.ए.एस रसायन उत्पादन तातडीने थांबवावे तसेच कोकणासाठी शिफारस केलेल्या विविध पर्यावरण समित्यांच्या अहवालांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पत्रकार व पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अनुज अनंत जोशी यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना स्पीड पोस्टद्वारे निवेदन पाठवले आहे. हेच निवेदन गृहराज्य मंत्री योगेश कदम व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही पाठवण्यात आले असून, खेड येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना त्याच्या प्रती देऊन शासनाच्या जबाबदार यंत्रणांना आगामी आंदोलनात्मक पवित्र्याची माहिती देण्यात आली आहे.
या निवेदनात पी.एफ.ए.एस या तथाकथित फेरेवर केमिकल्स मुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. ही रसायने निसर्गात नष्ट न होता पाणी, माती, अन्नसाखळी व मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. कर्करोग, हार्मोनल बिघाड व रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारख्या आजारांशी पी.एफ.ए.एस चा थेट संबंध असल्याचे संशोधनातून स्पष्ट होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने अन्नपॅकेजिंगमध्ये पी.एफ.ए.एस चा वापर बंद करण्याचा प्रस्ताव जाहीर केला असताना, लोटेसारख्या प्रदूषणग्रस्त औद्योगिक वसाहतीमध्ये अशा रसायनांचे उत्पादन सुरू होणे हे राष्ट्रीय धोरणांच्या विरोधात असल्याचे जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
लोटे परिसर आधीच प्रदूषणग्रस्त असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर व शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. कोकणातील नाजूक पर्यावरण लक्षात घेऊन माधव गाडगीळ समिती, के. रंगनाथन समिती व नारायण राणे समिती यांनी प्रदूषणकारी व धोकादायक रासायनिक उद्योग टाळण्याच्या स्पष्ट शिफारशी केल्या असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
माध्यमांशी बोलताना श्री. अनुज जोशी यांनी सांगितले की, राज्य व केंद्र सरकारने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, हीच अपेक्षा आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. मात्र २० जानेवारी २०२६ पूर्वी समाधानकारक निर्णय झाला नाही, तर २६ जानेवारी २०२६ रोजी काळी फित लावून संपूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते व कोकणवासीयांनी २६ जानेवारी रोजी काळी फित लावून आपले फोटो फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब व व्हॉट्सॲप स्टेटसवर #BanPFAS #PMO #CMO #Maharashtra #India2026 या हॅशटॅग्ससह अपलोड करून समर्थन दर्शवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सरकार या निवेदनाची दखल घेते का, याकडे आता कोकणवासीयांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्था फेडरेशनने अनुज जोशी यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.



