रत्नागिरी

अनेक वर्षे प्रतीक्षेत असणारे रत्नागिरी विमानतळ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होण्याच्या मार्गावर!

रत्नागिरी दि. २२ :- गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असणारे रत्नागिरीचे विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभारला जात आहे. नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई ते रत्नागिरीचा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ एका तासाभरात पूर्ण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरीचे विमानतळ अजूनही उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या या विमानतळाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून, हे विमानतळ  क्षेत्रीय संपर्क योजना (उडान योजना) अंतर्गत उभारला जात आहे. विमानतळावर प्रवासी टर्मिनल, धावपट्टी, टॅक्सीवे, एप्रन तसेच नेव्हिगेशन व सुरक्षा सुविधा उभारल्या जात आहेत. अंदाजे प्रकल्पावर ₹५०–५५ कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकणातील प्रवाशांसाठी हा पहिला मोठा नागरी विमानतळ ठरणार आहे.

विमान प्रवासामुळे प्रवाशांना केवळ वेळ वाचणार नाही, तर प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे. अंदाजे विमान तिकीट दर ₹१८०० ते ₹३००० पर्यंत ठेवले जाईल, जो सध्या रेल्वे किंवा बस प्रवासाच्या तुलनेत स्वस्त ठरेल. यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर व किफायतशीर होईल.

सरकारने सांगितले आहे की, विमानतळाचे उद्घाटन एप्रिल २०२६ पर्यंत होण्याची शक्यता आहे. उद्घाटनानंतर नियमित उड्डाणे सुरू होतील, ज्यामुळे मुंबईतून कोकण प्रवास करणे जलद आणि सोयीस्कर होईल. या विमान सेवेचा फायदाअर्थव्यवस्था, पर्यटन, रोजगार निर्मिती आणि स्थानिक उद्योगांना होईल. समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना थेट विमानतळावर उतरून प्रवासाचा वेळ वाचवता येईल.

प्रवासासाठी तिकीट बुकिंग, सुरक्षा तपासणी, फ्लाइट वेळापत्रक व इतर सुविधा यावर अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल. नवीन विमानतळामुळे रत्नागिरी आणि कोकणातील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि परवडणारा पर्याय मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button