रत्नागिरी

हातखंबा हायस्कूलजवळ केमिकल टँकर पलटी; चालक जखमी, वाहतूक कोडी

रत्नागिरी दि. २६ : मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल परिसरात आज सकाळी सुमारे 10.20 वाजता केमिकलने भरलेला टँकर उलटल्याने मोठा अपघात घडला. टँकर पलटी होताच त्यातील केमिकल रस्त्यावर सांडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वारंवार घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघाताच्या वेळी शाळेजवळ विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे स्पष्ट झाले. मात्र केमिकल रस्त्यावर पसरल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेला हा टँकर हातखंबा हायस्कूलजवळील तीव्र उतार आणि वाकडी वळणे पार करताना चालकाचा अंदाज चुकल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची माहिती मिळते. या ठिकाणी यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार घटना घडत असल्याने भीती व्यक्त होत आहे. 28 जुलै रोजी रात्री अकरा वाजता याच ठिकाणी गॅस टँकर पलटी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. सारी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. दुसऱ्या घटनेत हातखंबा येथे भरधाव डंपर च्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button