रत्नागिरी

संशोधन केवळ शैक्षणिक कामकाजात नाही तर उद्योग क्षेत्रात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते : कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन

रत्नागिरी दि. २१ : भारताने गेल्या दहा वर्षांत संशोधनामध्ये मोठी झेप घेतली आहे. संशोधनामध्ये भारताने सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी झेप घेतली. बायो फ्युएल, बायोलॉजिकल मॅन्युफॅक्चरींग, क्रिप्टोग्राफी, सायबर सिक्युरिटी ही नवनवीन संशोधन क्षेत्रे आहेत. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेली ही विज्ञान, तंत्रज्ञान परिषद संशोधनामध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत करेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संशोधन केवळ शैक्षणिक कामकाजात नाही तर उद्योग क्षेत्रात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्टार्टअप्स ४५० वरून १ लाख ५७ हजारांवर गेले आहेत, हे त्याचे उदाहरण आहे. भारत सेमिकंडक्टर क्षेत्रातही प्रगती करत आहे. अवकाश आणि खोल समुद्रातही भारत प्रगती करत आहे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी ऑनलाइन माध्यमातून बीजभाषण सादर करताना सांगितले.

पीएम- उषा योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अशा हायब्रिड पद्धतीने हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे ही परिषद आजपासून सुरू झाली. या वेळी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, परिषदेच्या संयोजक डॉ. मधुरा मुकादम उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे डॉ. अलिमियॉं परकार म्हणाले की, मूलभूत विज्ञानाने मानवी जीवनाची प्रगती घडवली. शिक्षणाच्या पद्धती आता बदलत आहेत. माणसाची मानसिकताही बदलत आहे. कुतुहलात्मक प्रश्न विद्यार्थ्यांचे भविष्यातील संशोधक निर्माण करायला मदत करतील.

अध्यक्षीय भाषणात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, वाईट गोष्टींचे चक्र आपोआप चालते, परंतु चांगल्या गोष्टीचे चक्र चालवायला लागते. त्याकरिता पालक, शिक्षकांनी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत. विज्ञानाच्या विविध संकल्पनांवर संशोधन परिषदेत निबंध, चर्चासत्रे होणार आहेत. त्यात चांगल्या गोष्टींचे चक्र फिरवण्यासाठीही मंथन करा.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, विज्ञानातील नवीन क्षेत्रे, भविष्यातील नवीन संधींना वाट करून देतात. संशोधन हे केवळ शैक्षणिक कार्य नसून ते मूल्याधिष्ठित कार्य आहे. उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. परिषदेचा मुख्य उद्देश एकत्र येऊन विविध विज्ञान शाखांना एकत्र करून संशोधनामध्ये योगदान देणे असा आहे, असे त्यांनी सांगितले.

समारोप कार्यक्रम उद्या (ता. २२) होणार असून याप्रसंगी दापोलीच्या कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पर्यावरण व संवर्धन जीवशास्त्र, हवामान बदल व जैवविविधता, शाश्वत विकासासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्रातील नव्या प्रगती, अनुप्रयुक्त गणित व भविष्य तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञानासाठी मशीन इंटेलिजन्स, हरित रसायनशास्त्र व पर्यावरणीय शाश्वतता, प्रगत पदार्थविज्ञान व नॅनोसायन्स, आरोग्य व औषधातील रासायनिक प्रगती आणि पारंपरिक ज्ञान व वनौषधी यावर संशोधन निबंध सादरीकरण व चर्चासत्र सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button