रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ उत्साहात; आयोग अधिक नागरिकाभिमुख होणार

रत्नागिरी दि. ३१ :- रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ सोहळा आज सकाळी उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. योगेश गुरव यांनी प्रभावी प्रस्ताविकाने केली.
या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ ना. उदय सामंत, उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यांनी आपल्या भाषणात वकील संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम कटिबद्ध राहून सेवा देत राहण्याचे आश्वासन दिले. न्याय व नागरिकहिताच्या दृष्टीने उभारणी केलेले अशा प्रकारचे उपक्रम न्यायव्यवस्थेला बळकटी देतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास मा. ॲड. विलास पाटणे, अध्यक्ष, रत्नागिरी बार असोसिएशन, तसेच मा. सौ. इंदुमती मलुष्टे-कोल्हापुरे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही या नूतनीकरण उपक्रमाचे स्वागत करत, कामकाज अधिक सुकर व जनहितमुखी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नूतनीकरणानंतर आयोगाची इमारत अधिक आधुनिक, सुरक्षित, सुबक आणि कार्यक्षम होणार असून नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी आणि निवारण प्रक्रियेसाठी आणखी सुधारित सुविधा मिळतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचा समारोप ॲड. रत्नदीप चाचले, सचिव, रत्नागिरी बार असोसिएशन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी मान्यवर, वकिल बांधव, अधिकारीवर्ग, पत्रकार प्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
उत्स्फूर्त उपस्थिती आणि सकारात्मक वातावरणामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. रत्नागिरीच्या न्यायव्यवस्थेच्या उन्नतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा पाऊल ठरेल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.



