क्रीडारत्नागिरी

जैतापूरचा आर्यन राऊत ‘कोकण कप’ कॅरमचा अजिंक्य विजेता!

जैतापूर दि. २८ (राजन लाड ) :- रत्नागिरी जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत जैतापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन राऊत याने राज्यस्तरीय सुपर लीग ‘अडसूळ ट्रस्ट–कोकण कप’ शालेय कॅरम स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

आर्यन हा जैतापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. राजप्रसाद राऊत यांचा चिरंजीव असून, आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने जैतापूर गावाचे तसेच संपूर्ण कोकणाचे नाव उज्ज्वल केले आहे.

ही प्रतिष्ठित स्पर्धा आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने एकूण सहा टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील २१८ शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

अंतिम सहाव्या टप्प्यात आर्यन राऊतचा सामना तिसऱ्या टप्प्यातील विजेता प्रसन्न गोळे याच्याशी झाला. डावाच्या सुरुवातीला ८–४ अशी आघाडी घेतलेल्या गोळेने जोरदार सुरुवात केली होती; मात्र अचूक नेम, संयम आणि रणनीतीच्या बळावर आर्यनने अंतिम टप्प्यात अप्रतिम पुनरागमन करत १७–१२ अशा फरकाने विजय मिळवला. या शानदार कामगिरीसह आर्यनने साखळीतील सर्वाधिक १० गुण मिळवून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

उपविजेते आणि अन्य विजेते खेळाडू प्रसन्न गोळे आणि पुष्कर गोळे — संयुक्त द्वितीय (८ गुण), तनया दळवी (राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू) आणि उमैर पठाण — संयुक्त तृतीय (७ गुण), तीर्थ ठाकर, शौर्य दिवेकर, ग्रीष्मा धामणकर, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण, विराज बर्वे — संयुक्त चौथा (६ गुण) उत्तेजनार्थ पुरस्कार.

उत्तम खेळ दाखवणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये वेदिका पोमेंडकर, रविराज गायकवाड, एन्जेल पटवा, ओम सुरते, आरव आंजर्लेकर, आर्या सोनार, चैतन्य पोमेंडकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गौरव समारंभ आणि मान्यवरांची उपस्थितीत विजेत्या खेळाडूंना ट्रस्टचे सचिव विष्णू तांडेल, युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्ट, क्रीडाप्रेमी संजय मांजरेकर, पंच चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, अविनाश महाडिक, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

कोकणातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील शालेय खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ लाभले असून, आर्यन राऊतसारख्या तरुण खेळाडूंच्या यशामुळे ग्रामीण भागातही कॅरम या खेळाची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button